पुण्यातील वकिलांचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र
पुणे – करोना व्हायरस हा चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असून, “बायो टेररिझम’साठी तो वापरण्यात येणार होता. मात्र, तो प्रयोगशाळेत लीक झाल्यामुळे वुहांन शहरातून त्याचा प्रसार झाला. त्याचा त्रास सर्व जगाला सहन करावा लागतो आहे, असा दावा करत करोनामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल चीनच्या “प्रेसिडेंट’ला जबाबदार धरून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, लोकांच्या जीविताशी निष्काळजीपणे वागणे या गुन्ह्यांखाली आंतरराष्ट्रीय कोर्टाने कारवाई करावी, त्यासाठी एक समिती नेमावी, अशी मागणी पुण्यातील वकील ऋषिकेश सुभेदार आणि आशीष पाटणकर यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाला पत्र पाठवून केली आहे.
ऍड. पाटणकर आणि ऍड. सुभेदार यांनी पत्र इंटरनॅशनल कोर्ट हेग आणि युनायटेड नेशन्सला पाठवले आहे. या कोर्टाला पाठवलेले पत्र जनहित याचिकेत त्वरित रुपांतरित करून घ्यावे, असे यात नमूद करण्यात आले आहे.