कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अन्यथा उच न्यायालयात जाणार : विक्रमबाबा पाटणकर


राजकीय चिखलफेक थांबवा

एकीकडे पाटण तालुक्‍यात लोक पुरामुळे हैराण झाले असताना आ. शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांची एकमेकात चाललेली राजकीय चिखलफेक ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. तेव्हा हे सगळे थांबवा आणि एक महिन्यानंतर दोघांनी निवडणुकीत एकमेकांची कपडे फाडा, असा टोला त्यांनी मारला. 

पाटण – कोयना धरणातील पाणीसाठा 90 टीएमसी पर्यंत पोहोचल्यावर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरु केले. पाऊस आणि कोयनेचे सोडलेले मोठ्या प्रमाणात पाणी यामुळेच पूरपरिस्थिती निर्माण झाली. अभियंत्यानी धरणातून केवळ पाणी सोडले नाही, तर धरणच फोडले त्यामुळे सांगलीपर्यंत पूर येऊन त्यात अनेकांचे जीव गेले. म्हणूनच कोयना धरणाच्या अधिक्षक आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर 302 आणि 420 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.

अन्यथा याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले. पाटण येथे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ते म्हणाले की, निर्माण झालेली पूर परिस्थिती ही मानवनिर्मित आहे. कारण कोणतिही पूर्वसूचना न देता कोयना धरण व्यवस्थापनाने केवळ 24 तासात ठरावीक अंतराने धरणाचे दरवाजे 2 फूटापासून ते 16 फूटांपर्यत उघडून 1 लाखा पेक्षाही जास्त क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे कोयनेपासून सांगलीपर्यंत जलमयस्थिती निर्माण झाली. निसर्गाचा यात कोणताही दोष नाही. कारण कोयना धरणातून पाणी सोडण्यापूर्वी महत्वाच्या 16 यंत्रणा यांना पूर्व कल्पना द्याव्यात असा नियम आहे.

एवढ्या प्रमाणात पाणी सोडायचे होते तर हेच पाणी सांगलीपर्यत पोचण्यास 16 पेक्षाही जास्त तासांचा वेळ लागतो. या अवधीत अनेक कुटुंबेही स्थलांतर करता आली असती, पण कसलाही विचार न करता धरणातून मनमानीपणे पाणी सोडले गेले याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.

विक्रमबाबा पुढे म्हणाले की, कोयना धरणात यापुढे फक्त 50 टक्के पाणीसाठा करावा, कारण एवढेच पाणी महाराष्टाच्या वाट्याला येते. उर्वरित पाणी कर्नाटकला द्यावेच लागते. कोयना धरण हे वीजनिर्मितीसाठी ओळखले जाते. त्यामुळे कोयना नदी काठच्या शेतीचे आणि घरांचे झालेले नुकसान हे वीज विक्रीतून झालेल्या उत्पन्नामधून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×