देहूगाव – आमदार सुनील शेळके यांच्या भाषणादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील भाषा वापरून गंभीर आरोप केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर सोशल मीडिया उपाध्यक्ष निखिल पडळकर यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, अशी मागणी देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार सुनील शेळके हे भाषण करीत होते. त्यावेळी फेसबुक पेजवर आमदार शेळके यांच्यावर अश्लील भाषेत आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर यांच्याकडे राष्ट्रवादीचे देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, सोशल मीडियाचे अध्यक्ष अमित घेणंद, विशाल काळोखे यांनी योगेश जाधव, शैलेश चव्हाण आदीच्या उपस्थितीत सुपूर्द केले.
भाजपच्या सोशल मीडिया विभागाने केलेल्या या कृतीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला आहे.