खेड तालुका रिपाइंच्या वतीने पोलिसांकडे मागणी
आळंदी- चाकण (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव गुट्टे यांनी सरकारी कामात कसूर केल्यामुळे व मदत मागणाऱ्यांवर पोलीस बळाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी खेड तालुका रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, चाकण येथे एका महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जवळचे नातेवाईक हे परगावी असल्याने त्यांना अंत्यविधीला पोहोचण्यासाठी एक दिवस उशीर होणार असल्याने या महिलेचा मृतदेह शीतपेटीत ठेवणे गरजेचे होते. यासाठी संबंधित दुःखीत कुटुंबातील नातेवाईक हे चाकण ग्रामीण रुग्णालयात शीतपेटीची विचारपूस करण्यासाठी गेले असता, त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे यांनी मदत न करता त्यांना हाकलुन लावले.
या कृतीचा जाब विचारण्यासाठी गेलेले खेड तालुका रिपाइंचे अध्यक्ष संतोषनाना डोळस, संपर्क प्रमुख विशाल कांबळे, अशोक अंकुश. गणेश घोडके, दिलीप पालवे या पदाधिकाऱ्यांवर डॉ. गुट्टे यांनी चाकण पोलीस ठाणे येथील टिमला फोनवर बोलवून पोलीस बळाचा गैरवापर केला. याबाबतची वस्तुस्थिती ही एपीआय राठोड यांच्या समोर घडली. त्यामुळे सदर घटनेचा रिपाई च्या वतीने जाहीर निषेध करून डॉ. गुट्टे यांच्यावर कारवाई करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खेड तालुका रिपाइंच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली.
- चाकण ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात शीतपेटी नाही. याबाबर वरिष्ठस्तरावरही पाठपुरवा सुरू आहे. दरम्यान, रुग्णालयात श्वविच्छेदन झालेलेच मृतदेह ठेवण्यात येतात. त्यादिवशीही रिपइंच्या कार्यकर्त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून मी पोलीस बोलवले होते. यात दुसरा कोणताही हेतू नव्हता.
– डॉ. केशव गुट्टे, वैद्यकीय अधिकारी, चाकण ग्रामीण रुग्णालय