दुबई -रोहित शर्माला विश्रांतीची गरज असल्याचा अहवाल फिजीओने पाठवल्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही, असा खुलासा बीसीसीआयने केला आहे. अर्थात, यानंतरही त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या मयंक आग्रवालची निवड होते मग रोहितलाच कसे डावलले जाते, असे प्रश्न आता बीसीसीआयला विचारले जात आहेत.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यानच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टी-20, एकदिवसीय तसेच कसोटी अशा तीनही संघात रोहितला स्थान दिले नाही.
आयपीएलदरम्यान रोहितला झालेली दुखापत पाहून निवड समितीने हा निर्णय घेतला, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी फिजीओंच्या मतासह रोहितबाबतचा अहवाल बीसीसीआयला पाठवला होता. संघाची निवड झाल्यानंतर रोहित फलंदाजीच्या सरावासाठी मैदानात उतरल्यामुळे निवड समितीलाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या अहवालानुसार रोहितला किमान दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे निवड समितीने नितीन पटेल यांच्या अहवालावरून रोहितला वगळले गेले आहे. प्रत्येक दौऱ्याआधी फिजीओ खेळाडूंबाबत जो अहवाल देतात त्यानुसारच संघ निवड केली जाते. 18 ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात खेळताना रोहितला दुखापत झाली होती.
कोहलीशी असलेला वाद भोवला?
रोहितला वगळण्यामागे कर्णधार विराट कोहली याच्याशी असलेला वादच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सशी असलेल्या वादामुळे बीसीसीआयने रोहितला वगळल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, रोहितच्या बाबतीत कोहली व बीसीसीआय राजकारण करत असल्याचेही संकेत मिळत आहेत.
वेंगसरकर यांचा संताप
सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आले नसल्याने माजी कर्णधार व निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर चांगलेच संतप्त झाले आहेत. गेल्या दोन मोसमांपासून सूर्यकुमारने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तरीही त्याला वारंवार डावलले जात आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने आणखी काय करायला हवे, असा संतप्त सवालही वेंगसरकर यांनी केला आहे.
तसेच रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात न आल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हे प्रश्न बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाच विचारले पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.