वेलिंग्टन : “सराई’ या चक्रिवादळाने फिजीला रविवारी तडाखा दिला. यामध्ये एक जण ठार तर अन्य एक जण बेपत्ता झाला आहे. चक्रिवादळामुळे 2,500 जणांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घरे, पिके आणि झाडांचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा करणारे खांब कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचा पुरवठाही खंडीत झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या काही विमानांची उड्डाणेही रद्द करावी लागली.
यामुळे फिजीमध्ये सुटी घालवण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी फिजीमध्येच अडकून पडले आहेत. कोदावू बेटाजवळ 18 वर्षांचा एक मुलगा बुडाला असल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे संचालक वासिती सोको यांनी सांगितले.
समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे आणखी एकजण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. तर अंगावर झाड कोसळल्याने जखमी झालेल्या अन्य एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला असल्यामुळे तब्बल 2,500 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
देशभरात 70 आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
रविवारी संध्याकाळी राजधानी सुवामधील 80 टक्के वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. परंतू देशभरातील वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी आठवडाभर लागण्याची शक्यता आहे.