कोल्लम – केरळच्या कोल्लम जिह्यामध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ)आणि संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीए) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली आहे. ही घटना रविवारी घडली.
केरळमध्ये प्रचारादरम्यान दोन पक्षांमध्ये झालेल्या या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. प्रचारावेळी सारेच पक्ष शक्तिप्रदर्शन करत होते. कोल्लम जिह्यातील पुयापल्ली येथे डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीए) या आघाडीतील पक्षाचे कार्यकर्ते रोड शो दरम्यान एकमेकांसमोर आले. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला. थोडय़ा वेळाने या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झाले.