सांगली – जिल्ह्यातील इस्लामपुरात एका गर्भवती महिलेने ग्रहणाच्या काळातील अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे. या महिलेने ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह अनेक शारीरिक हालचाली केल्या. तसेच प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून ग्रहणाचाही आनंद घेतला. समृद्धी जाधव असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी ग्रहणाच्या काळात अंधश्रद्धेतून निषिद्ध ठरवलेल्या अनेक दैनंदिन कृती करुन या अंधश्रद्धा झुगारल्या आहेत.
हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या प्रयत्नाने राबविण्यात आला. यावेळी इस्लामपुर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल याही उपस्थित होत्या. यावेळी समृद्धी जाधव म्हणाल्या, आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे आणि माझ्या कुटुंबाचं प्रबोधन केले. त्यानंतर आम्ही हे धाडसी पाऊल टाकले. माझ्या कुटुंबीयांनीही मला यात साथ दिली.
या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला. विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला नको का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.