पंतच्या दिल्लीचा आज धोनीच्या चेन्नईशी सामना; चेन्नईची मदार ‘या’ चार फलंदाजांवर

मुंबई – महेंद्रसिंह धोनीचे सल्ले शिरसावंध मानून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावलेल्या ऋषभ पंतसाठी आजचा सामना स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जशी पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची लढत होत आहे. या सामन्याद्वारे यंदाच्या स्पर्धेत विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे.

दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन, तुफान भरात असलेला पृथ्वी शॉ, अजिंक्‍य रहाणे व अफलातून टचमध्ये असलेला नवनियुक्‍त कर्णधार ऋषभ पंत यांच्यावरच त्यांची फलंदाजी अवलंबून आहे, तर चेन्नईलादेखील धोनीसह सुरेश रैना, चेतेश्‍वर पुजारा, रवींद्र जडेजा, फाफ डुप्लेसिस, सॅम कुरेन व ऋतुराज गायकवाड यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी रैनाने करोनाच्या भीतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळी धोनीच्या संघाने अत्यंत सुमार कामगिरी केली होती.

यंदा सर्व प्रमुख खेळाडू संघात परतले असून, गतवैभव मिळवण्यासाठी चेन्नईला पहिल्या सामन्यापासूनच आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. त्यांचे पहिले चार फलंदाज कशी कामगिरी करतात यावर त्यांचे या स्पर्धेतील यश अवलंबून आहे. अष्टपैलू ड्‌वेन ब्राव्होदेखील या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून धोनीलाही आपली कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत धोनीने फारशी चमक दाखवलेली नव्हती.

त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. बेस्ट फिनिशर धोनीचे युग संपले असेही बोलले गेले. त्यामुळे अत्यंत शांत प्रवृत्तीच्या धोनीला यंदाच्या स्पर्धेत सरस कामगिरी करत टीकाकारांना योग्य उत्तर द्यावे लागणार आहे. अंबाती रायडू व कृष्णाप्पा गौतम हे फलंदाज कोणत्याही संघाचे मनसुबे उधळून लावू शकतात. त्यामुळे दिल्लीच्या इशांत शर्मा, टॉम कुरेन, रवीचंद्रन अश्‍विन, अमित मिश्रा, मार्कस स्टोनिस व ख्रिस वोक्‍स यांना अत्यंत भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे.

दुसरीकडे कागदावर पाहिले तर दिल्लीची फलंदाजी चेन्नईपेक्षाही जास्त बलाढ्य दिसते. त्यातही पंत व पृथ्वी अत्यंत भरात असून, त्यांच्या जोडीला सलामीवीर शिखर धवनसारखा अनुभवी फलंदाज असल्याने दिल्लीचे पारडे या सामन्यात जड राहणार आहे. त्यातही ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज व माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथदेखील दिल्लीकडे असल्याने त्यांना मधल्या फळीत कोणतीही चिंता राहिलेली नाही. तरीही चेन्नईला दबावाखाली ठेवायचे असेल, तर चेन्नईला किमान 180 ते 200 धावा फलकावर लावाव्या लागणार आहेत.

केवळ इतकेच नव्हे तर त्यांच्या शार्दुल ठाकूर, मिचेल सॅन्टनर, हरिशंकर रेड्डी व लुंगी एन्जीडी यांना दिल्लीच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडने माघार घेतल्याने जेसन बेरेनडॉर्फचा संघात समावेश करण्यात आला असून, त्यामुळे चेन्नईची गोलंदाजी सशक्‍तबनली आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहता हा सामना उच्चांकी धावसंख्येचा होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, दिल्लीच्या फलंदाजीत जी खोली आहे नेमके तिथेच चेन्नईचा संघ कमी पडणार असे वाटत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.