पुणे – मांजरी येथील सिरम कंपनीच्या कॅन्टीनचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांमध्ये किरकोळ कारणावरुन जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या हाणामारीत लोखंडी अँगल आणि पत्र्याचा वापर करण्यात आला.
कामगार आबुबकर हक (वय 30, रा.मांजरी) याने दिलेल्या फिर्यादीनूसार, बाबासाहेब बर्वे, आनंद तापकीर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी एकाच ठिकाणी काम करतात. येथे बांधकामाच्या पाण्यासाठी बॅरल ठेवण्यात आला आहे. याच्यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. यावेळी आरोपीने पोकळ पत्र्याच्या पाईपने मारहाण करुन जखमी केले.
तर आनंद तापकीर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार आबुबकर हक व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. बॅरलवरुन वाद झाल्यावर फिर्यादीस आरोपीने लोखंडी अँगलने मारहाण केली. यानंतर त्याच्या साथीदाराने फिर्यादीस धरुन ठेवले होते. तसेच फिर्यादीसोबत मिस्त्री काम करणारे बर्वे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही लोखंडी अँगलने मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.