-->

उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांत हाणामारी

लखनौ – उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात भयंकर हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत शेतकरी जखमी झाले आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी ट्‌विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुजफ्फरनगरच्या शाहपूर पोलीस ठाणे हद्दतील सोरम गावात हा सर्व प्रकार घडला आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. याउलट शेतकऱ्यांमध्ये नव्या कृषी कायद्यांबाबत जागृती व्हावी म्हणून भाजपचे कार्यकर्ते गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपच्या या मोहिमेला शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याचे दिसत आहे.

मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते थेट आमनेसामने आले. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत बरेच लोक जखमी झाले आहेत. सोरम गावात भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाला. अनेक लोक जखमी झाले. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही, तर निदान त्यांना चांगली वागणूक तर द्या. शेतकऱ्यांची निदान थोडी इज्जत ठेवा. शेतकरी कायद्यांचे फायदे सांगायला जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी गावकरी सहन करणार नाही, असे जयंत चौधरी यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.