दोन्ही गटांच्या पंधरा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
शिक्रापूर – येथे कंपनीच्या गोडाऊनचे काम घेण्याच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या तब्बल पंधरा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डिंग्रजवाडी येथे असेलल्या एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम घेण्यावरून येथील काम आमचे आहे, या कारणावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यावरून दोन्ही गटांच्या युवकांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून हातामध्ये लोखंडी सळई, दगड, काठ्या घेऊन एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
याबाबत कानिफनाथ विनायक गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी किरण राजाराम गव्हाणे, कुमार कैलास गव्हाणे, प्रशांत रघुनाथ गव्हाणे, अनिकेत संजय गव्हाणे, ओंकार संजय गव्हाणे, प्रदीपराज मारुती गव्हाणे यांसह अनोळखी तीन ते चार युवक (नाव पत्ते माहित नाहीत, सर्व रा. डिंग्रजवाडी) यांच्यावर तर अनिकेत संजय गव्हाणे रयांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी कानिफनाथ विनायक गव्हाणे, सचिन पोपट गव्हाणे, दत्तात्रय राजाराम गव्हाणे, विकास रघुनाथ गव्हाणे, बालाजी भाऊसाहेब गव्हाणे (सर्व रा. डिंग्रजवाडी) यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.