Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरे जावे. तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार पक्षाला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार पक्ष आणि शरद पवार पक्षात राजकीय संघर्ष सुरु आहे.
सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असताना आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार पक्षाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी निश्िचत केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता.
यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार पक्षाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल ३६ तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज (१३ नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी पार पडली.
न्यायालयात सुनावणी दरम्यान शरद पवारांच्या वकिलांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचे काही फोटो आणि व्हिडीओ निवडणुकीत वापरले जात असल्याचा आरोप केला. यावर न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले. न्या. सूर्यकांत म्हणाले, जरी तो व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा फोटो – चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांच्या वकिलांना विचारण्यात आला.
तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडिओ कशाला वापरले? जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे अजित पवार पक्षाला खडसावले. तसेच एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण करा.
तसेच न्यायालयाच्या आदेशाचे निष्ठेने पालन करण्यात आले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार पक्षाने दिले.