पिंपरी – ज्ञानप्राप्तीला वयाची अट व बंधन नसते म्हणतात. भारतातील मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये कोणीही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. मात्र राजकारणासारख्या धकाधकीच्या व प्रचंड व्यस्तता असलेल्या क्षेत्रात राहून देखील शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी नुकतीच पाली भाषेतील एमफिल ही पदवी प्राप्त केली. या पदवीमुळे आता आमदारांच्या पदव्यांची संख्या पाचपर्यंत पोहोचली असून विधिमंडळातील ते सर्वात उच्चशिक्षित आमदार ठरले आहेत.
ऍड. चाबुकस्वार हे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे पिंपरी मतदारसंघातून निवडून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते गेली 12 वर्षांपासून आजही अध्यापनाचे काम करतात. आमदार झाल्यानंतर त्यांनी पाली भाषेत शपथ घेऊन राज्याचे लक्ष वेधले होते. बी. कॉम, डिप्लोमा इन पाली, एम. ए, एल. एल. बी, व एम. फील (पाली) अशी त्यांची शैक्षणिक पात्रता झाली आहे. आता पीएचडीसाठी तयारी सुरू केल्याची माहिती चाबुकस्वार यांनी दिली.