पाचवीतील मुलीचा सर्पदंशाने शाळेत मृत्यू

वायनाड (केरळ) : शाळेत बसलेल्या मुलीला साप चावल्याने दहा वर्षाच्या लहानग्या मुलीचा मृत्यू झाला. तिला दवाखान्यात नेण्यात दिरंगाई करणाऱ्या शिक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राहूल गांधी यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे केली.

पाचवीत शिकणाऱ्या स्नेहल शेरीन या विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्यानंतर तब्बल तासाभराने रुग्णालयात नेण्यात आले. ती केरळच्या वायनाड जिल्ह्यातील सुलतान बाथरी येथील सरकारी शाळेत शिकत होती. तिच्या पालकांनी तिला चार दवाखान्यात दाखल करण्याची पळापळ केली. मात्र सर्पदंशावरील प्रतिबधात्मक लस त्यांना कोठेही मिळाली नाही. त्यांना तेथून 90 किमीवर असणाऱ्या कोझीकोडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले.

या मुलीचा पाय जमीनीला असणाऱ्या बिळापाशी गेला असावा, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत शिक्षकाने उपचार करण्यात दिरंगाई केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे शिक्षण मंत्री सी. रविंद्रनाथ यांनी सांगितले. केरळ मानवी हक्क आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोग यांनी याप्रकरणात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

या मुलीला प्राथमोपचार करून तिच्या वडिलांना कळवण्यात आले. ते आल्यावर तिला दवाखान्यात हलवण्यात आले, असे मुख्याध्यापक के. के. मोहनन यांनी सांगितले. मात्र,विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचा हा दावा खोडून काढला. ही मुलगी साप चावल्यानंतर विव्हळत होती. तरीही शिक्षकांनी तिचे वडील येईपर्यंत वाट पाहिली. साप चावला हे सांगूनही शिक्षकांनी नखूरडे झाले आसेल, असे सांगून वेळ काढला, असे विद्यार्थ्यामचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.