चिल्लर पार्टीतर्फे उद्यापासून पाचवा बालचित्रपट महोत्सव

जगभरातील सहा सिनेमांचा समावेश ः आनंद काळे, मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन
कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत पाचवा बालचित्रपट महोत्सव मंगळवार, दि. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जगभरातील सहा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

चिल्लर पार्टीतर्फे महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरूक पालकांची मुले या उपक्रमाला उपस्थित असतात; परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा वंचित कुटुंबातील मुलांपर्यंत बाल चित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे गेली चार वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो.

यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे.
या महोत्सवाचे उद्‌घाटन 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या महोत्सवाचा समारोप 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.

हे आहेत चित्रपट
या महोत्सवात “बेब’, “फ्री विली’, “पीट्‌स ड्रॅगन’, “वॉटर हॉर्स’ आणि “डम्बो’ हे चित्रपट दाखविण्यात येणार असून “डॉग्ज वे होम’ हा समारोपचा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही चित्रपट प्राणीजगताशी संबंधित आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.