कोची – चीनच्या करोनाग्रस्त हुबेई प्रांतात अडकलेले केरळातील पंधरा विद्यार्थी आता सुखरूपपणे मायदेशी पोहचले आहेत. कोचीनच्या विमानतळावर त्यांची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हे विद्यार्थी चीन मधून प्रथम बॅंकॉकला आणि तेथून नंतर भारतात परतले.
विमानतळावर पोहचताच त्यांना स्टर्लाईज्ड ऍम्ब्युलन्स मधून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयातील स्पेशल वॉर्डात नेण्यात आले. त्यांना तेथे पुर्ण वेगळे ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक विमानतळावर पोहचले होते पण त्यांना या विद्यार्थ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल. त्यांना करोनाग्रस्त चीन मधील भागातून बाहेर जाण्यासही मज्जाव करण्यात आल्याने ते तेथे अडकून पडले होते.