-->

कागदपत्रांअभावी पंधराशे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

पिंपरी – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी शाळापातळीवर प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली. त्यामध्ये 3786 विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे. त्यापैकी फक्त 2175 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. तर 1511 विद्यार्थ्यांचा कागदपत्राअभावी प्रवेश होऊ शकला नाही.

आरटीई प्रवेशासाठी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी पार पडली. यामध्ये 3786 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांना कागदपत्रांची पूर्तता करत प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पहिल्यांदा 31 ऑगस्टपर्यंत व त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये 2175 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. पिंपरी व आकुर्डी या दोन्ही विभागाची मिळून 1511 विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी त्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तसेच काही पालकांना मनासारखी शाळा न मिळाल्याने त्यांनी प्रवेश घेणे टाळले. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी राहिले आहेत त्यांना यानंतर संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून निर्देश आल्यानंतर प्रवेश दिले जाणार आहे.

पोद्दार शाळेकडून चुकीची माहिती
पोद्दार शाळेसाठी निवड झालेल्या 96 विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाहीत. पोद्दार शाळा चिंचवड याठिकाणी होती. मध्यंतरी या शाळेचे स्थलांतर झाले. त्याबाबत शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाला कळविले नाही. तसेच तीन शाखा मिळून 96 जागा आरटीईसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने त्या माहितीच्या आधारवर निवड प्रक्रिया राबविली. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे एवढ्या जागा नाही. त्यामुळे 96 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाही. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे 1511 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाही. तसेच काहींना मनासारखी शाळा मिळाली नाही. त्यामुळे प्रवेश घेतले नाही. शासनाकडून निर्देश आल्यानंतर प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
– पराग मुंढे, शिक्षणाधिकारी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.