फिफा विश्वचषक: फ्रान्सवासीयांचा जल्लोषात विजयोत्सव

पॅरिस: फ्रान्सने क्रोएशियाचे आव्हान मोडून काढताना फिफा विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपदाची पूर्तता केली आणि मायदेशात लाखो फ्रेंच फुटबॉलशौकिनांनी अभूतपूर्व अशा जल्लोषात हा विजयोत्सव साजरा केला. पॅरिसमधील चॅम्प्स-एलिसीज ऍव्हेन्यू या प्रमुख चौकात साजरा झालेला हा आनंदोत्सवही फ्रान्सच्या विश्‍वविजेतेपदाइतकाच संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरला.

गेल्या काही वर्षांत महागाई, आर्थिक समस्या आणि अत्यंत भीषण अशा दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य बनल्यामुळे फ्रेंच नागरिक वेगळ्याच दडपणाखाली वावरत होते. या नागरिकांना आपल्या दैनंदिन समस्या आणि मानसिक दबावातून बाहेर येण्यासाठी फिपा विश्‍वचषक विजेतेपद हे जबरदस्त कारण मिळाले. अनेक फ्रेंच नागरिकांनीही याची ग्वाही दिली आणि आनंद साजरा करण्यासाठी असे संस्मरणीय कारण दिल्याबद्दल आपल्या फुटबॉल संघातील विजयी वीरांचे आभारही मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणताही आनंद आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत साजरा करणाऱ्या फ्रेंच नागरिकांनी फ्रान्सचे विजेतेपदही तशाच आगळ्यावेगळ्या शैलीत साजरे केले. फ्रेंच राष्ट्रध्वजाबरोबरच रंगीबेरंगी पोशाख आणि चित्रविचित्र हॅट्‌स परिधान केलेल्या हजारो फ्रेंच नागरिकांनी रस्ते भरून गेले होते. एका फुटबॉलशौकिनाने तर राष्ट्रध्वजाशिवाय अन्य काहीही परिधान केले नव्हते. मात्र कालच्या रात्री सारे काही माफ होते.

चौकाचौकांमध्ये फ्रेंच राष्ट्रध्वजाचे रंग असलेल्या निळ्या, पांढऱ्या आणि लाल या रंगांचे स्मोक बॉम्ब उडविले जात असल्याने वातावरण रंगीबेरंगी झाले होते. सम्राट नेपोलियनची विजयी कमान असलेल्या चौकात तर फ्रेंच फुटबॉलशौकिनांचा महासागरच पसरला होता. हजारो नागरिक बसस्टॉप, वृत्तपत्रांच्या किंवा भव्य जाहिराती लावण्याच्या स्टॅंड्‌सवर चढून फ्रान्सचा राष्ट्रध्वज फडकावीत होते. युवकांचे घोळके समूहाने राष्ट्रगीत गात रस्त्यारस्त्याने फिरत होते. शेकडो मोटारी वेगवेगळ्या आवाजांतील हॉर्न वाजवीत रस्त्यांनी फिरत होत्या.

पॅरिसमधील फॅन झोन येथे भव्य स्क्रीनवर अंतिम सामना पाहण्यासाटी अलोट गर्दी झाली होती. सुमारे 90 हजार क्षमतेच्या या फॅन झोनमध्ये भरगच्च गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 4000 पोलीस धडपडत होते. 1998 नंतर वीस वर्षांनी पुन्हा विश्‍वविजेतेपद पटकावल्याचे दाखवून देताना जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर 1998-2018 हे आकडे पुन:पुन्हा दाखविण्यात येत होते.

फिफा विश्‍वचषक विजेतेपद ही आमच्या वीरांची भन्नाट कामगिरी आहे, असे सांगून जॉफ्री हॅमसिक हे स्थानिक फुटबॉलशौकीन म्हणाले की, गेल्या काही दिवसांत फ्रान्समधील नागरिकांनी असंख्य समस्यांचा सामना केला आहे. किंबहुना दैनंदिन समस्या आणि दहशतवादी हल्ल्यांसारख्या बेभरवशी संकटांमुळे आम्ही कायमच अनामिक दडपणाखाली जगत आहोत. अशा वेळी आमचे मनोधैर्य उंचावण्यासाठी विश्‍वविजेतेपद हे सर्वोत्तम औषध आहे.

फ्रेंच राष्ट्रीय चिन्ह असलेली हॅट आणि युवा सेन्सेशन कायलियन एमबापेच्या 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या हॅमसिक यांनी हे विजेतेपद फ्रेंच नागरिकांना बेभान करणारे ठरल्याचे नमूद केले. कितीही संकटे आली, तरी आम्ही सर्वजण एकच आहोत, हे यातून दिसून आले, असे सांगून ते म्हणाले की, या प्रसंगी कोणताही धर्म, पंथ किंवा अन्य भेदभाव नष्ट झाले आहेत. आम्ही सर्वजण केवळ फ्रेंच आहोत ही एकतेची भावना प्रबळ ठरली आहे.

विजयोत्सवाला अपघात व लुटीचे गालबोट दहशतवादी हल्ल्यांच्या शक्‍यतेमुळे पॅरिसमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही या विजयोत्सवाला अपघात व लुटालुटीचे गालबोट लागले. सुमारे तीस युवकांच्या टोळक्‍याने एक दुकान फोडले आणि तेथील वाईनच्या व शॅंपेनच्या बाटल्या लुटून नेल्या. अनेकांनी आपल्या मोबाईलवर या प्रकाराचे चित्रीकरणही केले. तसेच डझनभर युवकांच्या टोळक्‍याने चॅम्प्स एलिसीज चौकातील दुकानांच्या काचा फोडल्या. तसेच रस्त्यातील कचरापेट्यांना आगही लावली.

बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या व्हॅनवर चढलेल्या शंभरावर युवकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. रस्त्यांवर वेगाने भटकणाऱ्या युवकांच्या मोटारसायकलने ठोकरल्यामुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली. फ्रान्सचा विजय साजरा करण्यासाठी कॅनॉलमद्ये उडी मारणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकांचा मान मोडल्यामुळे मृत्यू झाला. तसेच भरधाव मोटारसयकल झाडाला धडकल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. परंतु पोलिसांनी कोणालाही अटक केल्याची अधिकृत नोंद झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)