पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला : निषेधाच्या घोषणा
सातारा – काश्मीर येथे राज्य राखीव दलाच्या जवानांच्या तुकडीवर अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला घडून आणला त्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी राजधानी सातारा येथे उमटले. सातारा पालिकेच्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता पालिकेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येउन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. साताऱ्यात या भ्याड हल्ल्याचा सार्वत्रिक संताप प्रकर्षाने जाणवला. राजेंद्र चोरगे मित्र समूहाने राजवाडा परिसरातील चांदणी चौकात भला मोठा निषेधाचा फलक झळकवून आपला रोष व्यक्त केला. शहराच्या दर्शनी भागातील हा फलक येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
सकाळी नऊ वाजता राजेंद्र चोरगे आणि बालाजी परिवाराकडून या स्फोटातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. सातारा पालिकेत नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सातारा विकास आघाडीसह भाजप व नगर विकास आघाडीच्या सदस्यांनी या भ्याड हल्ल्याचा एकमुखी निषेध व्यक्त केला. वीर जवान अमर रहे च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा साताऱ्यात शिवसेना व रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स च्यावतीने निषेध करण्यात आला. सेनेने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज तर ब्ल्यू फोर्सने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध केला.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पोवाईनाक्यावर एकत्र येत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन केले. शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे म्हणाले, पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये तात्काळ सैन्य पाठवून दहशतवाद्यांचा खात्मा केलाच पाहिजे. यावेळी सचिन मोहिते, विक्रांत शिर्के, रमेश बोराटे, निलेश मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सने देखील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, देश अहिंसेच्या मार्गाने चालत असताना पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून येथे रोज हिंसा घडवत आहे. पंतप्रधानांनी आता पाकिस्तानशी कोणतीही चर्चा न करता दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे.