फिडेल एक धगधगती मशाल!

‘क्रांती म्हणजे गुलाबांची शय्या नाही. क्रांती म्हणजे भविष्य आणि वर्तमान यांतील संघर्ष आहे’ असे म्हणत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्ष केला असे व्यक्तिमत्व म्हणजे क्‍युबाचे भाग्यविधाते, क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो होय. क्‍युबाला संघटित करीत, अमेरिकेला नेहमी शह देत, एकहाती सत्ता त्यांच्याकडे क्‍युबन नागरिकांनी दिलेली होती. हाव्हॉना विद्यापीठातून कायद्याची पदवी घेऊन लोकांच्या मोफत केसेस कॅस्ट्रो नावाचा तरुण लढू लागला.

यातून तो चळवळीत सामील झाला. एका टप्प्यानंतर आपण व्यवस्थेचा भाग बनला पाहिजे, असे त्याने ठरविले. क्‍युबातली बॅटिस्टाची हुकूमशाही सत्ता उलथवून लावत तो तरूण अवघ्या विश्वातला बंडखोर तरुणाईचा नायक बनला. राष्ट्रीय प्रतीकांच्या आणि देशभावनेच्या बळावर क्‍युबन नागरिकांनी स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून क्‍युबाच्या स्वातंत्र्याला एका वेगळ्या उंचीवर नेले. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करीत, ती कायम तशीच राहावी, यासाठी फिडेल यांचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. जगाच्या नकाशावरील अगदी छोट्याशा क्‍युबाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झुंजवत ठेवले. क्‍युबातील कॅस्ट्रो यांची साम्यवादी राजवट म्हणजे अमेरिकेसाठी कायमच डोकेदुखी होती.

त्यामुळेच कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. यामध्ये कॅस्ट्रो यांच्यावर अनेक जीवघेणे हल्ले झाले, विषप्रयोग झाले मात्र ते प्रत्येकवेळी त्यातून वाचले. अमेरिकेने केलेला ‘बे ऑफ पिग्ज’ चा अयशस्वी प्रयत्नही जगाने पाहिला. क्‍युबातील कॅस्ट्रो यांची राजवट उलथवून टाकण्याचा हा प्रयोग अयशस्वी ठरला. उलट त्याने अमेरिकेची जगभर नाचक्की तर झालीच आणि कॅस्ट्रो यांच्या निर्विवाद नेतृत्वाची जगाला पुन्हा एकदा ओळख झाली. क्‍युबा आणि भारत यांच्यातील संबंध नेहमी चांगले राहिले आहेत. सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्यासाठी क्‍युबाने भारताला कायम पाठिंबा दिला आहे तर क्‍युबावरील अमेरिकी र्निबध उठवले जावेत यासाठी भारताने सतत प्रयत्न केले आहेत. फिडेल यांच्या एकाकी लढ्याबद्दल तरुणाई मध्ये प्रचंड आकर्षण आहे. तरूणाई या लढ्याकडे प्रेरणा म्हणून पाहते. विशेष म्हणजे या एकाकी झुंजीत ते यशस्वीही झाले. यामध्ये त्यांना भारत, चीन, रशिया आणि जगातील इतर काही देशांची वेळोवेळी मदत झालेली आहे.

लॅटिन अमेरिकेत पहिले साम्यवादी राज्य स्थापन करणाऱ्या क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन 25 नोव्हेंबर 2016 रोजी झाले. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

-श्रीकांत येरूळे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)