नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या आषाढी दिंडीचे मोजक्याच वारकर्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास प्रमुख गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
पहाटेच्या वेळी झालेल्या प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रय व किसनगिरीबाबांंच्या समाधीचे विधिवत पूजन वेदमंत्राच्या जयघोषात भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय…, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… असा गजर करत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
यावर्षी मोजक्याच वारकर्यांच्या निघालेल्या दिंडीचे नेतृत्व नव्याने नियुक्त झालेले स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज करत असून, दिंडीमध्ये फक्त सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका दर्शनासाठी बरोबर घेण्यात आलेल्या आहेत. दिंडीत विणेकरी नारायण महाराज ससे, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज नांगरे यांच्यासह तेरा ते चौदा वारकर्यांचा समावेश आहे.
दिंडीचे मुरमे ग्रामस्थांतर्फे सरपंच अजय साबळे, कविता साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, रामकृष्ण मुरदारे, मारुती साबळे यांनी स्वागत केले. त्यानंतर बकुपिंपळगाव, देवगड फाटा येथे राजेंद्र गीते, इकबाल शेख यांनी स्वागत केले. खडका फाटा व घाडगे पाटील यांच्या त्रिमूर्ती संकुलात अल्पोपहार देऊन स्वागत करण्यात आले. नेवासा फाटा येथे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, कृषितज्ज्ञ एकनाथ भगत, दीपक शिंदे, आदींनी स्वागत केले.