यात्राकाळातच व्हायरल इन्फेक्शन, टाईफाईडच्या साथीमुळे ग्रामस्थ हैराण
विजय लाड
कोयनानगर – कोयना विभागातील अनेक ग्रामदैवतांच्या यात्रा आजपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहेत. यात्रा आनंदात साजरी करण्यासाठी यात्रा कमिटीने विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच ग्रामदैवतांच्या यात्रांसाठी मुबंईमध्ये कामधंद्यांसाठी गेलेला चाकरमानी गावाकडे येऊ लागल्याने कोयना विभागात यात्रांचा फिव्हर दिसत आहे.
यातच कोयना विभागाचे हवामान दूषित असल्याने व्हायरल इन्फेक्शनमुळे थंडी, ताप व टाईफाईडचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. खासगी रूग्णालये रुग्णांमुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे कोयना विभाग धोक्याच्या उंबरठयावर आला असून आरोग्य विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे.
कोयना विभागातील किसरूळे, बोपोली, रासाटी, गोषटवाडी, मिरगाव, गाडखोप, गोकूळ, हूंबरळी, वाजेगाव, वांझोळे, कराटे, मणेरी, चाफेर-मिगाव या गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा आजपासून दि.४ सुरू होत आहेत. सलग ४-५ दिवस या यात्रा असल्याने कमिटीने यात्रा मोठ्या उत्साहात साजरी कऱण्यासाठी गावात विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात्रा कमिटीने कबड्डी, क्रिकेट स्पर्धा, तर अनेक ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
दरम्यान, कोयना विभागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे साथीचे रोग, टाईफाईड यासारख्या आजारामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ती वाढू होवू नये, यासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राने कोयनानगर व परीसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे.
किसरुळे यात्रा सुरू
कोयना धरणअंतर्गत असणाऱ्या आंबेघर या गावाचे सांगली जिल्ह्यातील पलूस येथे पुनर्वसन झाले आहे. या गावाचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री केदारनाथ देवाची पालखी किसरूळे गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या भेटीला आल्यावर किसरूळे गावाची यात्रा सुरू होते. पलूसवरुन आंबेघर गावाचे ग्रामदैवत श्री केदारनाथ देवाच्या पालखीचे आगमन शुक्रवारी झाले आहे. ‘भैरी-केदारीच्या नावाने चांगभलं’च्या गजरात किसरुळे गावाची यात्रा सुरू होते.