खरेदीवरही निवडणुकांचा फिवर

जॅकेट खरेदीला पसंती अन्‌ खादीलाही वाढती मागणी

सातारा  – लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रत्येक गावात, वॉर्डातील नेतेमंडळींचा उत्साह तर वाढलाच आहे; पण कपडे शौकिनही आता निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याची संधी घेत जॅकेट खरेदी करीत आहेत. चेरी, बदामी व निळ्या या रंगांच्या जॅकेट खरेदीला कार्यकर्त्यांची अधिक पसंती मिळत असल्याची माहिती जॅकेट विक्रेत्यांनी दिली. मात्र जॅकेटच्या गर्दीत खादीसुद्धा आपला रूबाब टिकवून आहे. जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिवून घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा रेडिमेड चार ते पाच हजार रुपयांतील खादी जॅकेट खरेदीकडे अनेक कार्यकर्त्यांची पसंती मिळत आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील व शहरातील वॉर्डातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे उमेदवारांकडून सुरु आहे. उमेदवारासमोर आपली छाप पडावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक पांढरी असणारी वेशभूषा बदलून पांढऱ्या वेशभूषेला जॅकेटचा आधार देताना दिसून येत आहेत.

दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जॅकेट घालण्याची आवड होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेटची क्रेझ वाढविली. अलीकडच्या पाच वर्षांत जॅकेट घालण्याची परंपराच निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात आपली वेगळी छाप मतदारांवर पडावी यासाठी नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्तेही जॅकेट घालत आहेत.
साताऱ्यात रेडिमेड जॅकेट विक्री सध्या जोमात होत आहे. साधारणपणे पाच हजार रुपये किमतीच्या जॅकेट खरेदीकडे कल दिसून येत आहे. यात विविध प्रकारचे रंग निवडण्याचा पर्याय आहे. काही कार्यकर्ते सातशे ते नऊशे रुपये मीटरप्रमाणे जॅकेटसाठी कापड खरेदी करीत आहेत. जॅकेट शिऊन देणाजया टेलरची संख्याही वाढली आहे. यासाठी एक हजार ते दीड हजार रुपये शिलाई दर घेण्यात येत आहे.

साताऱ्यात काही दिवसांत जॅकेट खरेदी करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अचानक वाढली आहे. शुभकार्य व निवडणुका अशाप्रसंगी वापरता येणाऱ्या जॅकेट खरेदीला ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. रंगीत व खादी असणाऱ्या पाच हजार रुपयांपर्यंतच्या जॅकेटलाही प्राधान्य मिळत असल्याची माहिती व्यावसायिक प्रदीप शहा यांनी दिली. उन्हाळ्यात कॉटन मिक्‍स खादीचीसुद्धा प्रचंड चलती आहे. खादी ग्रामोद्योगलासुद्धा आता सुगीचे दिवस आले आहे. भाजप व राष्ट्रवादीने बूथ लेव्हल प्लॅनिंगवर भर दिल्याने कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. लिनन खादी व्हाईट ब्लॉसम व्हाईट, शाईन व्हाईट अशा वेगवेगळ्या खादी शर्टची एक हजार रुपयांपासून चलती आहे. अप व्हाईट रिंकल फ्री खादीला इस्त्रीची भानगड नसल्याने त्या शर्टानासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे. शाहू चौक ते राजवाडा या दरम्यान सर्व कपड्यांची दालने खादी व जॅकेटने सजली आहेत.

रंग निवडण्यासाठी भरपूर पर्याय

जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिवून घेण्याकडे कल काही ग्राहकांचा आहे. विविध रंगाचे कापड जॅकेटसाठी उपलब्ध होत असल्याने ग्राहकांसमोर रंगांमध्ये भरपूर पर्याय असल्याची माहिती पार्क चौकातील खादी कापड दुकानदारांनी दिली.

लाईट कलरलाही मिळतेय पसंती

निळा, चेरी, हिरवा, काळ्या यासारख्या रंगांतील जॅकेट शिवून घेण्याचा कल ग्राहकांचा आतापर्यंत होता. मात्र काही महिन्यांपासून लाईट कलरमधील खादी कापड आणून जॅकेट शिवून घेण्याचा कल दिसून येत असल्याची माहिती जॅकेट शिवणारे टेलर संजय खुटाळे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.