फर्गसन महाविद्यालय आर्थिक तोट्यात

संस्थेने घेतला शुल्कवाढीचा निर्णय : विद्यार्थ्यांचा रोष वाढला

पुणे – देशातील प्रतिष्ठीत महाविद्यालय म्हणून ओळख असलेले पुण्यातील फर्गसन महाविद्यालय गुणवत्तेत पुढे असले तरी आर्थिक बाबतीत मागे पडले आहे. सध्यास्थितीत फर्गसन महाविद्यालय सहा कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. महाविद्यालय टिकवून ठेवण्यासाठी आता शुल्कवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत शुल्कवाढ केल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.

डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्गसन महाविद्यालय प्रशासनाने यावर्षीच्या बीए, बीएस्सी अभ्यासक्रमांचे शुल्क तिपटीने वाढविले आहेत. त्यावरून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, महाविद्यालय प्रशासनास धारेवर धरले होते. दहा ते पंधरा टक्‍के शुल्कवाढ समजण्यासारखे आहे. मात्र, तब्बल तिपटीने शुल्कवाढ झाल्याने विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रश्‍न विचारले असता संस्थेने महाविद्यालय प्रशासनाचा आर्थिक लेखाजोखा मांडला.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी आज पत्रकार परिषदेत नवीन अभ्यासक्रमाची घोषणा केली. फर्गसनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून “डेटा सायन्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी उपस्थित होते. काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्‍य नाही, हे वास्तव आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. एवढेच नव्हे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनालयाची योजना आखली आहे, असेही कुंटे म्हणाले.

शुल्कवाढीसंदर्भात कुंटे म्हणाले, गेल्या काही वर्षांत प्राध्यापक भरती बंद होती. त्यामुळे फर्गसनसह संस्थेच्या अन्य महाविद्यालयात नव्याने प्राध्यापकांची नियुक्‍ती नाही. त्यामुळे आम्ही नियुक्‍त केलेल्या प्राध्यापकांना संस्थेमार्फत वेतन द्यावे लागत आहे. जवळपास 140 प्राध्यापक पदे रिक्‍त आहेत. त्याचा भार संस्थेवर पडत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून फर्गसनवर आर्थिक डोलारा ढासळत आहे. अनुदानित संस्थेला दिले जाणारे वेतनेतर अनुदान शासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे संस्थेची बहुतांश अनुदानित महाविद्यालये तोट्यात आहेत. मात्र, प्रोबेशनल कोर्सेस योग्य पद्धतीने सुरू आहेत.

“डेटा सायन्स’साठी प्रवेश सुरू
फर्ग्युसन महाविद्यालयात यावर्षीपासून डेटा सायन्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 ते 28 जून आहे. प्रवेश परीक्षा 30 जून रोजी होणार आहे. बीएसस्सी पदवीप्राप्त विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र राहील. प्रवेशाची क्षमता 30 इतकी आहे. सध्या डेटा सायन्सचे महत्त्व वाढत असून त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.