महिला मतदारांनी अनुभवले लोकशाहीचे स्माइल!

जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागूल यांनी केलेली सजावट 

नगर  – महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सखी मतदान केंद्रांची रचना करण्यात आली असून नगर शहर विधानसभा मतदारसंघातील सुमारे चार सखी मतदान केंद्र आकर्षक रांगोळ्या, सेल्फी पॉइंट, लोकशाहीला पत्र, मतदानाची शपथ, मतदार स्वाक्षरी अभियान, सखींच्या मुलांसाठी खेळणी, सौंदर्यप्रसाधने आरशाच्या माध्यमातून सजले आहे.राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते मतदारदूत डॉ. अमोल बागूल यांनी या दोन्ही केंद्रावरील सजावट केली आहे.

दिल्लीगेट येथील अ.ए. सो. चे डी. एड्‌. कॉलेज व स्टेशन रोडवरील आयकॉन पब्लिक स्कूल या दोन ठिकाणी सखी मतदान केंद्रावर विविध संकल्पनाच्या माध्यमातून महिलांच्या गुणवत्तेला वाव देण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी ते मतदान केंद्राध्यक्षपर्यंत मतदान केंद्र महिलाच चालवतात. यातील बहुतांश ठिकाणी मतदार देखील महिलाच आहेत. महिला मतदारांच्या सोबत असलेल्या लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, घसरगुंडी, झोके आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. होय मी मतदान केले आणि ही लोकशाहीचा स्माइल आहे… असं वाक्‍य लिहिलेला आरसा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

भल्यामोठ्या पोस्ट कार्डवर मतदानाची लिहिलेली शपथ तसेच मतदार स्वाक्षरी अभियानात ममाझी सही माझे मतफ म्हणून महिलांनी केलेला संकल्प, त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या विविध कविता, सुविचार देखील सखी मतदान केंद्रावर लावण्यात आलेले आहेत. आकर्षक रांगोळ्या व रंगीबिरंगी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. विविध फळा-फुलझाडांच्या कुंड्यांचा देखील चपखल वापर सजावटीमध्ये करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीनचे मॉडेल या केंद्रावर ठेवण्यात आले आहे. मतदान जनजागृतीचे घोषवाक्‍यं यांची अनोखी रांगोळी देखील मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. नगरच्या या उपक्रमाचीदेखील प्रस्तुती सखी मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.

लोकशाहीचा उत्सव स्पर्धेतील निवडक मतदार जनजागृती चित्रे व पोस्टर्स या केंद्रांवर लावण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील, नायब तहसीलदार शीतल पाटील आदींचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देखील याच केंद्रांवर बागुल यांनी सखी मतदान केंद्राची सजावट केली होती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)