प्रभाव नाहीच : अवघी साडेपाच टक्के मते
पिंपरी – पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या चार विधानसभा मतदार संघातून 48 पैकी अवघ्या सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, झालेल्या एकूण मतदानाच्या अवघी 6 टक्के मते महिलांना मिळाली आहेत. विशेष म्हणजे एकाही महिला उमेदवाराला स्वतःचे डिपॉझिट वाचविता आले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह मावळातील ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज आहे. मात्र, मावळसह पिंपरी-चिंचवड कामगारनगरीची पहिल्या महिला आमदाराची आस अद्यापही कायम आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का कमी असला तरी महिलांची संख्या आणि त्यांचे प्रश्न आजही कायम आहेत.
यावेळी शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी नाकारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी विधानसभा मतदार संघातून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी त्यांच्याकडील एबी फॉर्म काढून घेत शेवटच्या क्षणी माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तुल्यबळ अशी एकही महिला उरली नाही.
चार मतदार संघातील एकूण 48 उमेदवारांपैकी 6 महिला उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, त्यांचा म्हणावा तसा बोलबाला निवडणुकीत झाला नाही. शहरातील उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत अवघी 6 टक्के मते या महिला उमेदवारांना मिळाली आहेत. त्यामुळे एकाही महिलेची निवडणुकीची अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचू शकली नाही. भोसरी विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या शहानवाज शेख यांना इतर महिला उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक 13 हजार 151 मते मिळाली. या मतदार संघात त्यांना मिळालेल्या मतांचा टक्का अवघा पाच इतका आहे. उर्वरीत पाच महिला उमेदवारांना एक हजार मतांचाही टप्पा ओलांडता आला नाही.