महिला पोलीस विवाहित प्रियकरासोबत क्वारंटाईन; पत्नीस सुगावा लागताच फुटले बिंग

नागपूर – देशभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना सदृश्य लक्षणं असलेल्यांना तातडीने संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोना सदृश्य रुग्णांना वेळीच क्वारंटाईन केल्याने विषाणूचा संभाव्य प्रसार रोखता येत असल्याने या लढ्यात क्वारंटाईन सेंटर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. असंच एक क्वारंटाईन सेंटर सध्या चर्चेत आहे. मात्र या चर्चेमागे कोरोना नसून काही औरच आहे.

त्याचं झालं असं की, कोरोना सदृश्य लक्षणं असलेल्या नागपुरातील  एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये प्रेम-विरह सहन करावा लागू नये यासाठी प्रियकराचे नाव पती म्हणून नोंदवले. यानंतर तिच्या त्या ‘कथित’ पतीला तिच्यासोबत क्वारंटाईन करण्यात आले. मात्र महिला कॉन्स्टेबलसोबत क्वारंटाईन असलेला तिचा ‘तो’ प्रियकर विवाहित होता. त्याची पत्नी क्वारंटाईन व विवाहबाह्य संबंधांबाबत अनभिज्ञ होती.

आपला पती तीन दिवसांपासून घरी येत नसल्याकारणाने ‘त्या’ क्वारंटाईन पुरुषाच्या पत्नीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आपला पतीचे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे महिलेस कळाले. यानंतर तिने थेट क्वारंटाईन सेंटर गाठले मात्र सुरक्षिततेच्या कारणाने तिला प्रवेश नाकारण्यात आला.

यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत घडला प्रकार पोलीस आयुक्तांच्या कानावर घातला. यानंतर आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण समोर येताच आता ‘त्या’ पुरुषास एका वेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.