बुलडाणा – महिला पोलीस कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महिला कर्मचारी मॉर्निंग वॉक करत असताना चिखली रोडवर घडला आहे.
गीता बामंदे, वय 40 असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या पोलीस लाईन, बुलडाणा येथील रहिवासी आहेत. त्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या.
सफरचंद घेऊन मलकापूरकडून चिखलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने गीता यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ट्रकचालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी आरडाओरड केल्याने गर्दी जमली व त्यास घेरले.
दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.