संतप्त जमावापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळणाऱ्या महिला पोलिसाचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

पटना – औरंगाबाद कारागृहातील एका कैद्याचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने रास्ता रोको करत दगड फेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना बिहारच्या जहानबाद जिल्ह्यातील परसबिघा पोलीस स्थानक क्षेत्रातील नेहलपूर येथे घडली. कैद्याच्या मृत्यूनंतर जमावाने रस्त्यावर येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

याबाबतची माहिती समजताच स्थानिक पोलीस जमावास शांत करण्यास घटनास्थळी पोहोचले. मात्र जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. जमावाच्या हल्ल्यामध्ये एका महिला पोलीस शिपायाच्या मृत्यू झाला असून ६ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल आहेत. उपचार सुरु असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंकेतस्थळांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या गोविंद मांझी यास परसबिघा पोलिसांनी अटक केली होती. त्याला औरंगाबाद येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र मांझी याचा शनिवारी कारागृहातच मृत्यू झाला. ही बातमी समजताच मांझी याचे नातलग व गावकरी संतप्त झाले. त्यांनी जहानाबाद अरवल एनएच 110 वर रास्तारोको करत पोलिसांवर मांझी यास मारहाण केल्याचा आरोप केला. याबाबतची माहिती समजताच परसबीघा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस घटनास्थळी येताच माझी याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेला जमाव अधिकच चवताळला. यांनी पोलिसांवर लाठ्याकाठ्यांसह हल्ला करत दगडफेक देखील केली. या घटनेत जमावापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळणारी एक महिला पोलीस कर्मचारी एका वाहनाखाली चिरडली गेली. या महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक पांडे यांनी दिली.

दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी जमावातील ४ ते ५ जणांना अटक केली आहे. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमुक तैनात करण्यात आली आहे.          

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.