पिंपरी – घरगुती भांडणाला कंटाळून डॉक्टर महिलेने पेटवून घेतल्याचा प्रकार चिंचवड येथे शुक्रवारी घडला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा रविवारी मृत्यू झाला. योगिता चेतन चौधरी (34, रा. उद्योगनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेत त्या शंभर टक्के भाजल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून पती डॉ. चेतन चौधरी, सासू रजनी चौधरी आणि सासरे गोविंद चौधरी यांच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
योगिता आणि तिचे पती चेतन हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचे चिंचवड परिसरात स्वत:चे रुग्णालय आहे. काही दिवसांपासून योगिता आणि त्यांच्या सासरकडील मंडळींमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारीदेखील त्यांच्यामध्ये वाद झाल्याने सासरकडील मंडळींनी योगिता यांना मारहाण करून त्यांच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी, पोलिसांनी योगिता यांना समज देऊन सोडून दिले होते. त्यानंतर योगीता या घरी गेल्यावर पुन्हा वाद झाला. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी विषारी द्रव मिसळून पिले. काही वेळानंतर सोसायटीजवळच्या किराणा दुकानात जाऊन त्यांनी रॉकेल विकत आणले. विषारी द्रव प्यायल्याने योगिता यांना पोटात मळमळू लागले.
त्यामुळे त्यांनी पती चेतन यांना घरी बोलविले. त्यावेळी, पती चेतन यांनी योगिता यांना रागावून पुन्हा मारहाण केली. यामुळे संतापलेल्या योगिता यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतण्यासाठी घेतले असता चेतन यांनीही बाटलीतील रॉकेल योगिता यांच्या अंगावर टाकून काही स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. व हातात काडीपेटी घेतली. त्यामुळे, योगिता यांना आता पती आपल्याला मारेल असे वाटल्याने त्यांनी बाटलीतील उर्वरित रॉकेल आपल्या अंगावर ओतून घेतले व चेतनच्या हातातील काडीपेटी घेऊन स्वत:ला पेटवून घेतले.