पुणे – पीएच.डी.च्या 100 विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी.एच.डी. करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर जेआरडी टाटा फेलोशिप देण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाला पर्याय म्हणून ही फेलोशिप देण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिना 8 हजार तर एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. मात्र, मागील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू न करण्यात आल्याने त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमिवर पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना सरसकट विद्यावेतन न देता 100 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेकडून घेण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मिळणाऱ्या निधीतून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात होते. मात्र, हा निधी बंद झाल्याने निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमिवर गुणवत्तेच्या आधारावर शंभर विद्यार्थ्यांना जेआरडी टाटा फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती देताना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, जेआरडी फेलोशिपसाठी विभागनिहाय येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणानुसार त्या त्या विभागांच्या फेलोशिपची संख्या निश्‍चित केली जाणार आहे. फेलोशिपसाठी गुणवत्तेचे निकष काय असावेत याचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल. त्यानंतर पी.एच.डीच्या विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या या निर्णयाची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. त्याचबरोबर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आगामी वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या (2019-20) सिनेटमध्ये मांडावयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)