कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी 5 जणांचे पाय धुतले आणि त्यांचा सन्मान करुन आदर व्यक्त केला. “स्वच्छ कुंभ, स्वच्छ आभार’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांनी 10 हजार सफाई कर्मचारी, स्वच्छताग्रही, पोलिस कर्मचारी आणि नाविकांचा काल प्रयागराज इथे कुंभमेळ्यात सन्मान केला.
कुंभ मेळ्यात स्वच्छतागृहांची आणि परिसराची साफ-सफाई करणाऱ्या 18 हजार सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभमेळा भागात 1 लाखांहून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि 20 हजार कचराकुंड्या बसवण्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सफाई कर्मचारी आणि स्वच्छताग्रहींच्या प्रयत्नांमुळे भारतातील स्वच्छतेचे जागतिक स्तरावर कौतुक झाल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. कुंभमेळा 2019 हा डिजिटल कुंभ मेळा म्हणून कार्यान्वित करण्यात आला होता आणि भविष्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये याच धर्तीवर कार्य करण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले. सफाई कर्मचारी आणि स्वच्छताग्रहींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वच्छ सेवा सन्मान योजनेची घोषणा केली. 51 कोटी रुपयांच्या स्वच्छ कुंभ कोषाची स्थापना करण्यात आली असून, सर्व पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी 15 मार्च 2019 पर्यंत करण्यात येणार आहे.

कुंभ मेळा सर्वांसाठी सुरक्षित करण्याकरता राज्य तसेच केंद्रीय दलातील पोलिस कर्मचारी, नाविक यांनी केलेल्या कार्याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 6 सफाई कर्मचारी, 6 पोलिस कर्मचारी, 2 स्वच्छताग्रही आणि 2 नाविकांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.