वडगाव शेरी येथील उद्यानातील प्रकल्पाबाबत पालिकेचा प्रस्ताव
पुणे – वडगावशेरी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात असलेल्या “सेव्हन डी’ थिएटरसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला असून, यावर मंगळवारी निर्णय होईल.
शहरातील महापालिकेने एकूण 201 उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांमध्ये स्थापत्य, हॉर्टीकल्चर, विद्युत विषयक कामांचा समावेश आहे. वडगावशेरी येथील सनसिटीजवळ उद्यान विभागाने 2014 मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान साकारले आहे. या उद्यानात नागरिकांसाठी वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जॉगिंग ट्रॅक, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायाम साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी, फुलराणी, ज्येष्ठांसाठी पॅगोडा, संगीत कारंजे, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही आदींचा समावेश आहे.
दररोज एक हजार नागरिक घेतात लाभ…
वडगावशेरी येथील “सेव्हन डी’ थिएटरमध्ये सजीवसदृश्य चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या, प्रवेश शुल्क न घेता नागरिकांना मोफत चित्रपट पाहण्याची सुविधा देण्यात येत आहे. दररोज, 900 ते एक हजार नागरिक याचा लाभ घेत आहेत. भविष्यात हे थिएटर सुस्थितीमध्ये सुरू ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
या प्रस्तावानुसार 3 वर्षापुढील मुलांसाठी 20 रुपये, प्रौढांसाठी 40 रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी 100 रुपये प्रवेशशुल्क ठेवण्याचे प्रशासनाने सुचविले आहे.