कागदपत्रे दाखविण्याच्या अडचणी; कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
पुणे – करोनामुळे न्यायालयाचे कामकाज अनेक दिवस बंद होते. केवळ महत्त्वाच्या दाव्यांची सुनावणी होत होती. मात्र, आता अंशत: न्यायालय सुरू झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये युक्तिवादासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर केला जात आहे.
मात्र, प्रत्यक्ष करताना जो आत्मविश्वास असतो, कोर्ट रुममधील वातावरण असते. तर, व्हिसीद्वारे युक्तिवाद करताना मर्यादा येतात. वेळेचे बंधन असणार आहे. प्रत्यक्ष केलेल्या युक्तिवादाचा फील येत नाही. कागदपत्रे, उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखविणे अडचणीचे बनणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीत व्हिसीद्वारे युक्तिवाद करणे योग्य आहे. मात्र, तो कायमचा पर्याय होऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केल्या.
प्रत्यक्ष युक्तिवाद करणे वेगळे असून, कोर्ट रुम ड्रामा महत्त्वाचा आहे. समोर न्यायाधीश, दोन्ही बाजूचे वकील, पक्षकार तेथे उपस्थित असतात. त्यामुळे तेथे वेगळे वातावरण असते. केस चालविताना आणि युक्तिवाद करताना वेगळा आत्मविश्वास असतो. व्हिसीद्वारे तेवढा आत्मविश्वास राहणार नाही. कागदपत्रे दाखविणे अवघड होणार आहे. काळानुसार काही दिवस व्हिसीद्वारे युक्तिवाद करायला हरकत नाही. मात्र, तो कायमचा पर्याय नाही.
– ऍड. हर्षद निंबाळकर, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा
प्रत्यक्ष केलेल्या युक्तिवादासारखा फिल ऑनलाइनने येत नाही. ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष युक्तिवादामध्ये जास्त सांगता येते. विषयाची मांडणी व्यवस्थित करता येते. काही महत्त्वाच्या गोष्टी पटवून देता येतात. दोषारोपपत्राची कागदपत्रे दाखवता येतात. न्यायालयाच्या शंकांचे निरसन करता येते. कित्येक वकिलांना अद्याप आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नाही. युक्तिवादामध्ये समोरचा वकील चुकीचे सांगत असेल, दुसऱ्या वकिलाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल. तर तो कसा घेणार. ऐन वेळेस उपस्थित झालेले मुद्दे सांगणे अवघड बनते.
– ऍड. पुष्कर दुर्गे, मा. कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन