समंजस नात्याचा अनुभव…

सकाळी जाग आली. डोळे उघडले तर समोर तू ट्रे घेऊन उभा. त्यात चहा आणि मला आवडणाऱ्या पेस्ट्रीज आणि चार टप्पोरे गुलाब.
“हॅपी बर्थडे डिअर!’
“ओह. थॅंक्‍यू, इतक्‍या सुंदर सरप्राईजसाठी.’
तू गुलाबाची फुलं हातात दिलीस. हलकेच कपाळावर ओठ टेकवून पुन्हा विश केलंस.
“हा तुला आवडतो तसा आलं घालून केलेला चहा आणि तुझ्यासाठी खास आवडतात म्हणून आणलेल्या ह्या पेस्ट्रीज.’
“कित्ती रे गोडेस तू…’ असं म्हणून मी तुला एक गोड मिठी मारली.

“बरं आज पूर्ण दिवस तुझ्यासाठी बुक केलाय मी माझा. आपण दोघांनी एन्जॉय करायचा आहे.’
“ओक्के चलेगा. आपण दोघे सुट्टी घेऊ. तसाही उद्या संडे आहे. मस्त एन्जॉय करू.’ दरम्यान, आई, बहीण, सासूबाई, मैत्रिणी असे फोन येऊन गेले. व्हाट्‌सअप. फेसबुक तर अक्षरशः ओसंडून वाहात होते शुभेच्छांनी आणि तेवढ्यात एक फोन आला अननोन नंबरचा.
“हॅलो. कोण?’ मीच विचारले.
“हॅलो. हॅपी बर्थडे!’ पलीकडे एक कोणीतरी पुरुष होता. उगाचच आवाज ओळखीचा वाटला.
“हो थॅंक्‍स, पण कोण बोलतंय कळलं तर बरं होईल, प्लिज.’
“कळेल लवकरच आणि हो रोजच्याइतकीच आजही सुंदर दिसशील माहीत आहे, भेटू लवकरच,’ असं म्हणून त्याने फोन ठेवलासुद्धा. तुला हे सांगू की नको, ह्या भ्रमात तुला सांगायचे राहूनच गेलं.
“तू अगदी परफेक्‍ट बर्थडे प्लॅन केला आहेस वाटतं माझा?’
“तर तर एकुलती एक बायको आहे माझी. लाडाची. करायला नको?’ तू दिवाळीत घेतलेला काळ्या रंगाचा स्लिव्हलेस वनपीस घालून मी बाहेर आले आणि तू बघतच राहिलास माझ्याकडे.

खूप सारे शॉपिंग आणि एक मस्त मुव्ही बघून आपण घरी आलो. तो निनावी आलेला फोन मी पूर्णपणे विसरून गेले होते आणि तुला त्याबद्दल सांगायलाही. सगळ्या शॉपिंग बॅग्ज सोफ्यावर टाकत हुश्‍श करत सोफ्यावरच डोळे मिटून बसले होते आणि अचानक बेल वाजली. तू आत पाणी प्यायला गेला होतास. मीच दार उघडलं आणि दारात तुझ्याच वयाचा एक प्रचंड हॅंडसम पुरुष!
“हाय. हॅपी बर्थडे अगेन.’ मला शॉकच बसला. कारण हाच तो आवाज आणि माणूस. ज्याचा सकाळी निनावी फोन आलेला होता.
“नाही ओळखलंस ना मला?’
“थोडाफार ओळखीचा वाटतो आहे चेहरा, पण आत्ता नाही ओळखलं.’ तो आत आला. सोबत आणलेला बुके मला दिला आणि म्हणाला,
“सुंदर दिसत आहेस. नेहमीप्रमाणे!!!’
“हो. प्लिज पण आधी कोण तुम्ही सांगाल का?’ त्याने बोलायला सुरुवात केली.
“नक्कीच. मी तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या कॉलेजमध्येच होतो. एक वर्ष तुम्हाला सिनियर.’
“अरे! हो?’ मी आश्‍चर्यचकित झाले.
“हो आणि मला तू खूप आवडायचीस. मी ठरवलं होतं की, तुला प्रपोज करायचं आणि नेमकं…’
“नेमकं काय?’
“नेमकं तुला तुझ्या आत्ता असलेल्या नवऱ्याने लग्नाची मागणी घातली आहे आणि तुमचा साखरपुडाही ठरला आहे असं कळलं. मी तुला रोज फॉलो करायचो. पण बोलायला कचरत होतो, पण फार वाईट वाटलं तुला मी नाही बोलू शकलो ह्याचं.’

“आणि मग?’
“मी तुला गेली दोन वर्ष फेसबुक-इन्स्टा सगळीकडे फॉलो करतो आहे. तुझे फोटो बघतो आहे कारण तू मला अजूनही आवडतेस.’
“पण आता काय त्याचे?’
“बरोबर आहे. आता काहीच नाही. पण प्रेम असं संपत नाही ना. ते असतंच माणूस आपलं नाही झालं तरीही…’
“हो पण आज का मग सांगता आहात?’
“कारण मी एका नवीन नात्याची सुरुवात करायला जातो आहे. लग्न ठरलंय माझं.’
“पण आता तुम्हाला हे विसरून जायला हवं आहे.’

“तेच तर! जुन्या न जोडल्या गेलेल्या नात्याचं ओझं जरा हलकं करायला आलो आहे. उद्या माझा साखरपुडा आहे.’
मला सगळंच अनपेक्षित. अचंबित करणारं होतं. काय बोलावं. आनंद की राग मानावा की आपल्यावर कोणी इतकं प्रेम करतंय याचा.
“सॉरी. याचा तुला त्रास झाला असेल तर. पण तू कायम माझं पहिलं प्रेम राहशील. तुला त्रास देण्याचा मुळीच उद्देश नाहीये ह्यातून.’
“पण मला काय रिऍक्‍ट व्हावं कळतच नाहीये?’
“कळतंय मला. पण एक सांगू हे सगळं मला माझ्या होणाऱ्या बायकोने मला करायला सांगितले आहे.’
“म्हणजे तिला माहीत आहे हे सगळं!’
“हो… मी सांगितलं आहे सगळं तिला. तिनेच सांगितलं की, निदान हे पोहोचवावं तुझ्यापर्यंत.’

“एक मिनिट,’ असं म्हणून मी तुला बोलवायला मागे वळले तर तू तिथेच मागे उभा होतास.
“मी ऐकलं आहे तुमच्या दोघांचे बोलणे आणि मला अज्जीबात राग आलेला नाहीये की,ह्याचं तुझ्यावर प्रेम होतं आणि असेलही ह्यापुढे!’
“अरे तू काय बोलतो आहेस. तुला राग नाही आला का ह्या माणसाचा?’
“तू वेडी आहेस का? राग यायला त्याने काय तुला त्रास दिला आहे का? प्रेम तर व्यक्त केलं आहे. तो आता एक नवीन नातं जोडायला जातो आहे. तर त्याला आपण शुभेच्छा देऊया की दोघे जण.’ आणि तू येऊन त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी बोलू लागलास.

“शुभेच्छा मित्रा. तू माझ्या बायकोवर प्रेम करणारा माणूस आहेस. म्हणजे तू नक्कीच चांगला असणार. खात्री आहे. नवीन नातं जुळतं आहे. त्या नात्यावर माणसावर प्रेम कर. अगदी भरपूर कर. पहिलं प्रेम नाही येत विसरता. पण तुझ्या बायकोचा हक्क आहे तुझ्या प्रेमावर. सो प्रयत्न कर तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा.’
माझ्यावर प्रेम करणारी दोन माणसं माझ्यासमोर होती. एक नवरा आणि एक अव्यक्तातून प्रेम करणारा माणूस.
मी गोंधळलेली. नाती इतकी समंजस असतात, आजकाल?

– मानसी चापेकर

Leave A Reply

Your email address will not be published.