नवी दिल्ली – करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्यव्यवस्थेवर ताण आला असून यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसतायेत. एकीकडे करोनामुळे होणारे मृत्यू, रुग्णसंख्येतील धडकी भरवणारी वाढ, औषधे, बेड्स यांच्या तुटवड्यामुळे नाकारात्मकतेचे मळभ दाटून आल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे काही लोकांचा करोनाविरोधातील लढा इतरांनाही प्रेरणा देण्याचं काम करतोय. आज करोनाविरोधातील लढ्याच्या अशाच काही प्रेरणादायी कहाण्या जाणून घेऊयात…
करोनामुळे आई गेली मात्र…
देशातील लाखो लोकांप्रमाणेच करोना महामारीमुळे दिल्ली येथील एम्स रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीपक गुप्ता यांच्या वाट्याला देखील दुःख आले. मात्र यामुळे त्यांच्या रुग्णांची सेवा करण्याच्या इराद्यात कोणताही बदल झाला नाही. ‘माझ्या कुटुंबातील सदस्य एकामागून एक करोना पॉझिटिव्ह आले. दुर्दैवाने माझ्या आईने एक महिना करोनाशी लढा दिल्यानंतर एम्समध्येच तिची प्राणज्योत मालवली. महिनाभर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आईसाठी कोव्हीड केयरटेकर म्हणून काम केल्यानंतर पुन्हा एकदा कोव्हीड वॉरियरच्या भूमिकेत परतलो. यानंतर दोन वर्षांच्या कोव्हीड पॉझिटिव्ह मुलाचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन केले. पीपीई किट व करोना संबंधीचे सर्व नियम पाळून केलेली ही शस्त्रक्रिया सदैव लक्षात राहील’ डॉ. गुप्ता सांगतात.
संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह!
दिल्लीतील द्वारका सेक्टर-१४ येथे राहणारे विक्रम कुमार यांच्यासाठी करोना महासाथ मोठं आव्हान घेऊन आली. त्यांच्या घरातील त्यांची ताई तिचा १२ वर्षांचा मुलगा व ४ वर्षांची मुलगी असे चौघेही करोनाबाधित असल्याचं समोर आलं. होळीच्या दिवशी सर्वांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी घरातच आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला. कोणालाही गंभीर स्वरूपाची लक्षणं नव्हती. मात्र तरीही डॉक्टरांनी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करत व स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये ठेऊन त्यांनी करोनाला हरवलं. शेजाऱ्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस करोनाला हरवण्यात महत्वाचं ठरल्याचं ते आवर्जून सांगतात.
स्वतः करोना पॉझिटिव्ह असताना घरातूनच रुग्णसेवा
दिल्ली येथील डॉ. परिणीती कौर यांचा करोनाविऱोधातील लढा व त्यांचे रुग्णसेवेप्रतीचे समर्पण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. डॉ. परिणीती या स्वतः पॉझिटिव्ह असून देखील रुग्णांना ऑनलाईन तपासत आहेत. यामागे त्यांच्या कुटुंबाची प्रेरणा असल्याचं त्या सांगतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन करून ‘तुला लवकर बरं व्हावं लागेल कारण यावेळी रुग्णांना तुझी अधिक गरज आहे’ असं म्हणत प्रेरणा दिल्याचं त्या सांगतात.
करोना रुग्णांसाठी घरपोच दूध, भाजीपाला
अनेक ठिकाणी सौम्य लक्षणं असलेले करोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. मात्र अशा रुग्णांना दूध, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. अशा रुग्णांसाठी गाजियाबाद येथे सहा जणांची एक टीम काम करत आहे. हे सर्व जण सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून ते घरात आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करतात.