दौंड – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा आदेश पाळत दौंड सकल जैन समाजाच्या वतीने परंपरेला फाटा देऊन भगवान महावीर जयंती उत्सव आणि महावीर जन्म कल्याणक महोत्सव मिरवणूक यंदा रद्द केली.
दौंड सकल जैन समाजाच्या तरुणांच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त दौंड शहरातील भटक्या जनावरांना चारा व उसाची कुट्टी देण्यात आली. दौंड शहरातील श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिर, श्री वर्धमान जैन स्थानक श्रावक संघ येथे जाण्याचे टाळून आपापल्या घरीच कुटुंबीयांसह प्रार्थना व पूजा केली.
अनेक कुटुंबांनी भगवान महावीर मिरवणुकीचा देखावा घरीच उभा केला. जैनबहुल भाग असलेल्या दौंड शहरातील सरनोत गल्ली परिसरात जैन बांधवांनी गॅलरीमध्ये येऊन भगवान महावीर यांचा जयघोष केला, तसेच जगा आणि जगू द्या, सत्य अहिंसा आणि ज्ञानाचा मार्ग धरा अशा घोषणा दिल्या.