हॅले खुल्या टेनिस स्पर्धेत फेडररचे दहावे विजेतेपद

हॅले – विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार असलेल्या रॉजर फेडरर याने येथील हॅले खुल्या स्पर्धेत दहावे अजिंक्‍यपद पटकाविले. त्याने अंतिम फेरीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याचा 7-6 (7-2), 6-1 असा पराभव केला.

फेडरर या 37 वर्षीय खेळाडूने या मोसमात ग्रासकोर्टवर एकही सामना गमावलेला नाही. विम्बल्डन स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. त्याला अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये संघर्ष करावा लागला. हा सेट टायब्रेकरपर्यंत रंगतदार झाला. टायब्रेकरमध्ये फेडरर याने पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने बिनतोड सर्व्हिसचाही उपयोग केला.

दुसऱ्या सेटमधील पहिलाच गेममध्ये गॉफीन याने खराब सर्व्हिस केली. त्याचा फायदा घेत फेडरर याने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. त्याने गॉफीन याला फारशी संधी दिली नाही व हा सेट जिंकून विजेतेपदावर मोहोर नोंदविली. फेडरर याने आतापर्यंत एकेरीत 102 विजेतेपद मिळविली आहेत. त्याला विम्बल्डनच्या नवव्या विजेतेपदाची प्रतिक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.