वॉशिंग्टन – राफेल नदाल टेनिस विश्वाला गवसलेला नवा सुपरस्टार आहे. त्याचे पदार्पण, त्याची विजयी वाटचाल त्याची प्रगती मी स्वतः पाहिली आहे. त्याच्याकडे अफाट जिद्द आहे आणि म्हणूनच मला त्याचे कौतुक वाटते, अशा शब्दांत स्वित्झर्लंडचा मानांकित टेनिसपटू रॉजर फेडरर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
नदालने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय टेनिस खेळायला प्रारंभ केला तेव्हापासून मी त्याची प्रगती पाहात आहे. सुरुवातीला तो ग्रासकोर्टवर फारसा यशस्वी होत नव्हता. क्ले कोर्टवरचा हा बादशहा ग्रासकोर्टवर मात्र सातत्याने अपयशी ठरत होता. मला त्यावेळी त्याचे आश्चर्य वाटायचे. पण काही वर्षांतच त्याने ग्रासकोर्टवरही सरस कामगिरी केली व त्यात आजतागायत सातत्यही टिकवले. ज्या गोष्टींमध्ये तो अपयशी ठरला त्यातच तो आता माहिर झाला आहे. त्याचे डावपेच, त्याचा जोश व प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबाव टाकण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे, असेही फेडररने सांगितले. त्याच्याविरुद्ध खेळताना खिलाडूवृत्ती जोपासली जाते, असेही फेडररने सांगितले.