नवी दिल्ली: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातच एका व्हिडिओने चोरट्यांच्या धाडसाचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. व्हिडिओमध्ये चोर अगदी बिनधास्त चोरी करताना दिसत आहेत.
मध्य प्रदेशातील दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा हा व्हिडिओ आहे. यात दुचाकीवरील दोन चोर स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेची साखळी ओढून घेतात आणि तिथून फरार होतात. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्वालियरमधील आहे. यात स्कूटीवर एक महिला आणि तिचा मुलगा गाडीवरून जात होते. इतक्यात दोन दुचाकीस्वार स्कूटीवर जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करू लागतात.
#WATCH | Madhya Pradesh: Two bike-borne miscreants snatch chain from a woman in Gwalior, in broad daylight pic.twitter.com/dHnvfp2dr8
— ANI (@ANI) August 26, 2021
नंतर संधी मिळताच ते महिलेची साखळी ओढण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान महिला साखळी वाचवण्याचा प्रयत्न करते मात्र इतक्यात दुसरा व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन साखळी तिच्याकडून ओढून घेतो. चोराचा दुसरा साथीदार गाडी सुरू करून ठेवतो. या घटनेनंतर दोन्ही चोर तिथून फरार होतात.
या घटनेनंतर महिला आणि तिचा मुलगा पूर्णपणे घाबरले आहेत. या घटनेच्या वेळी रस्त्यावरुन इतरही गाड्या जाता येताना दिसत आहेत. मात्र, चोर अशा गर्दीच्या ठिकाणीही चोरी करत आहेत. यामुळे मध्य प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल करणारी ही घटना ठरत आहे. या घटनेबाबत बोलताना मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील पदव पोलीस स्टेशनचे टाउन इन्सपेक्टर विवेक अस्थाना म्हणाले, की आमच्याकडे संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यानुसार लवकरच आम्ही अज्ञात सोनसाखळी चोरांना अटक करू असे त्यांनी म्हटले आहे.