ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे सावट

जुन्नर तालुक्‍यात बिबट्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी प्रबोधनाची गरज
अणे  (वार्ताहर) –जुन्नर तालुक्‍यातील प्रमुख दोन साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांच्या तांड्यांचे तालुक्‍यात आगमन झाले आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे ऊसतोड कामगार बिबट्याच्या परिसरात आहले आहेत. दिवस रात्र काम करत असतात. आपला संसार उघड्यावर ठेऊन जीव धोक्‍यात घालून यांना काम करावे लागते. मात्र, वर्षानुवर्षे हे काम करत असताना त्यांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था येथे नाही.

जुन्नर तालुक्‍यात उसाचे प्रमाण जास्त आहे, तसेच हा तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यातील माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रही आहे. मात्र, उसाच्या या क्षेत्राचा लपण्यासाठी आणि मोकाट, तसेच पाळीव जनावरांची शिकार करता येत असल्याने या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसा देखील मानवी वस्तींवर आणि रस्त्यावर येऊन बिबटे येथील जनांवर आणि माणसांवर हल्ले करतात.

बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, जालना अशा विविध जिल्ह्यांतून ऊसतोड कामगार जुन्नर तालुक्‍यात आले आहेत. हे मजूर दिवस-रात्र ऊसतोड करीत असतात. हा मजूर वर्ग प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री आणि बांबूच्या सहाय्याने कोपी तयार करतो. अशा बांधलेल्या घरातच त्यांचे वास्तव्य असते. घरात पुरेशी जागा नसल्याने या मजुरांच्या कुटुंबाला उघड्यावरच झोपावे लागते. अर्थातच यामुळे बिबट्यांचे त्यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण वाढत आहेत. अनेक ऊसतोड कामगारांनी गेल्या दोन-तीन वर्षात आपला बिबट्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा आहे. भीमाशंकर आणि बिघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून या उसतो कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता कामगारांची सुरक्षा बेभरवशांची असल्याचे चित्र या भागात आहे.

पहाटे तीन वाजता सुरू होतो दिवस
मुकादम लोकांच्या ऐंशी ते नव्वद हजार रुपये उचल घेऊन ती फेडण्यासाठी चार ते पाच महिने धडपड करीत असतात. रात्री दोन ते तीन वाजता यांचा दिवस चालू होतो. रात्री-अपरात्री जीवाची पर्वा न करता यांना ऊसतोडणी करावी लागते. रात्री झोपडीत लाईट नसतात, वाऱ्यामुळे दिवाही तग धरत नाही. झोपडीत पुरेशी जागा नसल्याने कुटुंब-कबिल्यासह बाहेर मैदानावर रात्र काढताना बिबट्याच्या हल्ल्याच्या सावटाखालीच येथील पाच-सहा महिने त्यांना काढावे लागतात.

ऊसतोड कामगारांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतची माहिती वनविभागाने संबंधित साखर कारखान्यांना पत्रव्यवहार करून कळवण्यात आले आहे. बहुधा ऊस तोडणी करताना कामगारांना बिबट्याची पिल्ले सापडतात, त्यावेळी अशा वेळी ताबडतोब माहिती वन विभागाला कळवावी, तसेच जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र असल्याने ऊसतोड कामगारांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
योगेश घोडके वनपरिक्षेत्र, अधिकारी,ओतूर

Leave A Reply

Your email address will not be published.