पिंपरी – लहान मुलांसोबत एकटीच राहत असलेल्या महिलेला वर्दीचा धाक दाखवत पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना भोसरी येथे घडली. आकाश प्रकाश पांढरे असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत महादेवनगर, भोसरी आणि साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली. आरोपी पांढरे हा हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे. फिर्यादी या त्यांच्या लहान मुलासोबत एकट्या राहत होत्या. त्यावेळी आरोपी पांढरे याने वर्दीचा धाक दाखवत तू एकटीच आहेस, कशी राहते ते बघतो, अशी धमकी दिली.
त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूद्ध वेळोवेळी लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक अत्याचारही केला. त्यातून महिला गरोदर राहिली असता आरोपीने तिला गोळ्या खायला देत तिच्या इच्छेच्या विरूद्ध गर्भपात घडवून आणला. पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.