RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला; IB ने जारी केला ‘अलर्ट’

पंजाब – पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय पंजाबमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे. विशेषतः आरएसएस शाखा आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते.
असा इशारा आज आयबीने पंजाब सरकारला दिला असून, त्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सर्व अधिकाऱ्यांना गस्त वाढवण्यास सांगितले आहे. रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केल्यानंतर एक तृतीयांश अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नुकताच 21 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मोटारसायकल स्वारांनी पठाणकोटमधील आर्मी कॅम्पजवळ ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र यामागे आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे. 15 ऑगस्टपासून आतापर्यंत 25 हून अधिक ड्रोन भारतीय हद्दीत घुसले आहेत. याशिवाय शस्त्रे, हेरॉईन आणि टिफिन बॉम्ब पाठवले जात आहेत. आतापर्यंत 11 टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

आयएसआय पंजाबमध्ये सातत्याने शस्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे. अलीकडेच झालेली अजनाळा घटन दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. अजनाळ्याच्या शर्मा फिलिंग स्टेशनवर झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी जवळपासच्या गावातील चार तरुणांना अटक केली होती. त्यापैकी रुबल आणि विकी हे दोघेही पाकिस्तानमधील इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे प्रमुख कासिम औरव, भाई लखबीर सिंग रोडे यांच्या संपर्कात होते.

तीन दिवसांपूर्वी जीरा विधानसभा मतदारसंघातील सेखवान गावातील शेतात टिफिनमध्ये हातबॉम्ब सापडला होता. आयबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयने पंजाबमध्ये सीमेपलीकडून टिफिन बॉम्ब आणि ग्रेनेड पाठवले आहेत. ज्यामुळे मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. आयबीला पंजाबमधील हिंदू नेत्यांवर आणि आरएसएसच्या शाखांवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.