पाभे पाण्याखाली जाण्याची भीती

राजगुरूनगर – पाभे (ता. खेड) गावाला सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. भीमानदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी घुसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने गावात भीतीचे वातवरण पसरले आहे.

पाभे येथील पूल कम बंधाऱ्याचे खालील दोन थराचे (दोन लाईन सुमारे 4 फूट) काढले नसल्याने भीमानदीला पूर आल्याने पाण्याचा फुगवटा वाढला आहे. तर प्रशासनाने पुलाचे ढापे न काढल्याने पुराचे पाणी गावालगत आले असून ते मोठ्या पावसात केव्हाही गावात शिरण्याची भीती व्यक्‍त केली जात असून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापनेचेही दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

भीमा नदीच्याकडेला सुमारे 100 कुटुंबे असलेले पाभे गाव असून या गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावाला जाण्यासाठी येथे गावाजवळ भीमानदीवर पूल कम बंधारा बांधण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे या बंधाऱ्यात पाणी साठवण्यात येते; मात्र पावसाळ्यापूर्वी पुलाची सर्व गेटचे ढापे कढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. यावर्षी मात्र, प्रशासनाने केवळ वरचे ढापे काढले खाली दोन थर काढले नसल्याने पुलात अगोदरच सुमारे पाच फूट पाणीसाठा राहिला होता.

येथील पुलाचे ढापे काढण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा प्रत्यक्ष भेटून व पत्रव्यवहार करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन ढाप्यांचा थर न काढल्याने गावासह या पुलालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. सुमारे 4 ते 5 फूट पाणीसाठा कायम असल्याने पुराच्या काळात हे धोक्‍याचे असल्याने ते तात्काळ काढावेत. पूल आणि नागरिकांना उद्‌भवणारा धोका टाळण्यात यावा अशी अशी मागणी सरपंच सुधीर भोमाळे, पाभे गावचे पोलीस पाटील संदीप कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मराडे, किसन जफरे, रामदास मराडे यांनी केली होती. मध्यंतरी पावसाचा जोर कमी झाला होता मात्र, याकडे दुर्लक्ष करीत हे ढापे काढले नाहीत यामुळे आज गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

भूस्खलनाची भीती
भोरगिरी, भीमाशंकर परिसरात शुक्रवारी (दि. 26) आणि शनिवारी (दि. 27) सलग मुसळधार पाऊस पडल्याने भीमेला पूर आल्याने पुलाच्या पाण्याचा फुगवटा गावापर्यंत आला आहे. तर गावाच्या मागे मोठा डोंगर असल्याने जोराच्या पावसात भूस्खलन होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)