कावळ्याच्या माळरानात विजेच्या धक्‍क्‍याची भीती

उमेश सुतार

मुख्य शिवारात जाणाऱ्या रस्त्यालगत ही धोकादायक स्थितीतील विद्युत डीपी आहे. या रस्त्यावर शिवारात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच वाहनांची सतत वर्दळ असते. सध्या या डीपी भोवती प्रचंड झाडे-झुडपे वाढलेली असून गारवेलींचा विळखा पडला आहे. डीपी शेजारी ऊस शेती असल्याने रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी यावे लागते. मात्र या धोकादायक डीपीमुळे रात्रीच्या सुमारास चुकून विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा बळी जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कराड – कराड तालुक्‍यातील कळंत्रेवाडी येथील कावळ्याचे माळ शिवारातील महावितरणच्या डीपींची दयनीय अवस्था झाली असून उघडी पडलेली डीपी व तुटलेल्या फ्युज बॉक्‍समुळे शिवारातील शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. सदरच्या डीपीमधून वारंवार ठिणग्या उडत असून ती करंट मारु लागल्याने शिवारातील शेतकऱ्यांवर सध्या भीतीची छाया असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान, या विद्युत डीपींची झालेली दयनीय अवस्था पाहून या शिवारात महावितरणचे अधिकारी अथवा कर्मचारी कितपत फिरकत असतील हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सहाजिकच या शिवारातील धोकादायक बनलेल्या या डीपीला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कळंत्रेवाडी येथील कावळ्याचे माळ तसेच पवार वस्ती या शिवारातील महावितरणच्या डीपींची फ्युज पेटी मोडकळीस आली असून सतत ती उघडीच असते. पेटीमध्ये असणाऱ्या फ्युजा, सॉकेट मोडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच विद्युत डीपी भोवती प्रचंड प्रमाणात झाडेझुडपे तसेच गारवेली वाढल्या आहेत. सदरची बसविण्यात आलेली डीपी जमिनीपासून काही अंतर उंचीवर असल्याने शिवारात जाणारी जनावरे याला घासून जाण्याची भीती आहे.

तसेच शेतकऱ्यांचाही चुकून स्पर्श होण्याचा धोका असून यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कळंत्रेवाडी तसेच नाणेगाव आणि परिसरातील जवळपास सर्वच विद्युत डीपींची अशीच अवस्था असल्याचे चित्र आहे. सर्वत्र शिवारात बहुतांश डीपींची अशीच परिस्थिती असताना देखील महावितरणची भूमिका मात्र सर्व काही ठीक असल्यासारखीच आहे. महावितरणचा हा भोंगळ कारभार एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच सुधारणार का? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

या भागातील महावितरणचा हा ढिसाळ कारभार शेतकऱ्यांच्या पाचविलाच पूजला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उत्तरमांड नदीकाठी स्मशानभूमी शेजारील डीपी भोवताली सुध्दा वेली, झुडपांचा विळखा पडला असून म्हसोबा-लक्ष्मी ग्रामदैवतांकडे जाणारी वीजवाहक केबल जमिनीवर अंथरुण नेण्यात आल्याने एखाद्या जनावरांचा किंवा शेतकऱ्याचा तिच्यावर पाय पडून दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे.

पवार वखारी जवळील डीपीमधील फ्युज बॉक्‍स पुर्णपणे सडल्याने पावसाचे पाणी थेट फ्युज सॉकेटवर पडून तीही डीपी धोकादायक बनली आहे. डीपीमधील विद्युत तारा ढिल्या असल्याने वाऱ्याच्या वेगाने एकमेकाला चिकटून ठिणग्या पडल्याने वारंवार ऊस जळण्याचे प्रकार घडत असून या डीपींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

डीपीच्या या दुरवस्थेबाबत उंब्रज उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार यांना वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. परंतु वेळकाढू धोरणामुळे कळंत्रेवाडीतील डीपींची अशी दयनीय अवस्था झाली आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने याकामी लक्ष घालून दुरुस्ती करावी.

मच्छिंद्र थोरात सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.