बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या लाटेची शक्यता दिसायला लागल्यामुळे तेथील वैद्यकीय यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यायला सुरुवात केली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये जून महिन्यात करोनाची साथ झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. नवीन “एक्सएक्सबी’ व्हेरिएंटची लागण वाढायला लागल्यामुले आठवड्याभरात चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग तब्बल 65 दशलक्ष लोकांना झालेला असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
चीनमधील वादग्रस्त “झिरो कोविड’धोरण अचानक आणि विशेष पूर्वतयारी न करता मागे घेतले गेल्यामुळे “एक्सएक्सबी’ विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील माध्यमांनी चीनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
“एक्सएक्सबी’या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराला रोखण्यासाठी दोन नवीन लसींना प्राथमिक मंजूरी देण्यात आली आहे. आणखीन 3 ते 4 नवीन लसींना मंजूरी दिली जाईल, असे चीनचे साथरोग विषयीचे शास्त्रज्ञ झेड हॉंग एन अनशान यांनी सांगितले. मात्र त्यांनी यासंबंधीची अधिक कोणतीही माहिती दिली नाही.
“झिरो कोविड’धोरण मागे घेतले गेल्यानंतर येणारी ही साथ पूर्वीसारखीत घातक असण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या साथीमध्ये चीनमधील 85 टक्के लोकसंख्येला करोनाचा संसर्ग झाला होता. नव्याने येणारी साथ कमी घातक असेल. मात्र ज्येष्ठांमधील मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी बुस्टर लसीकरण कार्यक्रम वेगाने राबवण्याची गरज आहे. तसेच रुग्णालयांमध्ये ऍन्टिव्हायरल औषधांचा पुरवठा त्वरित होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.