नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात कोरोनामुळे अत्यंत भितीचे वातावरण आहे. साधा सर्दी, खोकला झाला तरी अनेकांच्या मनता शंका येत आहे. याच भितीपोटी आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे या समजातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. कर्नाटकाच्या उडीपी जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
मृत व्यक्ती कर्नाटक राज्य रस्ते परिवहन सेवेमध्ये प्रशिक्षक होता. बुधवारी सकाळी लवकर तो घरातून बाहेर पडला. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात झाडाला लटकून त्याने गळाफास घेतला. झाडाजवळ असलेल्या खिडकीमध्ये एक चिठ्ठी सापडली. “आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भिती आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या” असे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
“मृत व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणे दिसली नव्हती तसेच तो कुठल्या उपचारांसाठी डॉक्टरांकडेही जात नव्हता” असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. “हा माणूस सातत्याने कोरोना व्हायरससंबंधी बातम्या पाहत होता. रविवारपासून तो खूपच घाबरला होता असे मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.