प्रशांत जाधव
पोलीस दलाची कसरत; करोनाच्या लढाईत स्वत:च्या जीवापेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ
सातारा – सातारा जिल्हा पोलीस म्हणजे धाडसाचा उत्तम नमुना. आजही कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार आहेत. “करोना’शी लढताना थोडेसे बिचकल्यासारखे झाले तरी आपल्या कर्तव्यापसून ते तसूभरही ढळत नाहीत. दंगल असो किंवा गुन्हेगारीचा बिमोड त्यासाठी पाठीमागे हात धुऊन लागणाऱ्या सातारा पोलिसांना सध्या “करोना’ संसर्गाच्या भीतीने अन् कर्तव्याच्या धास्तीने भलतेच ग्रासले आहे.
करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेतील प्रमुख घटक म्हणून पोलीस काम करत आहेत. असे असले तरी पोलिसांनाही जीव आहे, त्यांनाही कुटुंब असल्याने धाडसाने कोणत्याही संकटाचा सामना करणारे सातारा पोलीस करोनाच्या बाबतीत काळजी घेत कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.
“करोना’ या शब्दाने अख्ख्या जगाची झोप उडवली आहे. जगभरातील अनेक देशांना या विषाणूने व्यापून टाकले असतानाच आता याच करोनाने राज्यात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप तरी करोनाबाधित रुग्ण सापडला नाही. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने करोनाचा सामना करण्यासाठी मोठी तयारी केली आहे.
महसूल, आरोग्य, पोलीस या यंत्रणा यात प्रामुख्याने काम करताना दिसत आहेत. यात आरोग्य विभाग स्वच्छतेचे संदेश, तपासणी, उपचार यासारखी कामे करत आहे. तर पोलीस यंत्रणेकडे सर्वात मोठी अन् महत्वाची जवबादारी आहे. परदेशांतून, परराज्यांतून येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करणे, करोना संशयित रुग्णांची पाळत करणे, आरोग्याच्या वस्तूंचा साठा करून होणारा काळाबाजार रोखणे, मंदिर, मशीद यांसारख्या धार्मिक ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, अफवा पसरवणाऱ्यांची माहिती गोळा करून त्यावर प्रतिबंध घालणे, सरकारचे आदेश पाळला जात नसल्यास इतर विभागांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यास स्वत: गुन्हा दाखल करणे अशी कामे करून त्यांना त्यांची नेहमीची कायदा व सुव्यस्था राखावी लागत आहे.
हे सगळे करताना पोलिसांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, सततची धावपळ होत असल्याने पोलिसांना ते शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात करोनाची धास्ती तर आहेच पण कर्तव्यपूर्तीची इच्छाशक्तीही प्रबळ असल्याचे दिसून येत आहे.