वॉशिंग्टन – अमेरिकेच्या करोना विरोधी लसीला अन्न व औषध प्रशासनाकडून आणीबाणीच्या वापराची अधिकृत मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता मिळालेली मॉडर्ना ही दुसरी लस बनली आहे. आठवड्याभरापूर्वीच फायझर- बायोएन्टेकच्या लसीलाही अशीच आणीबाणीच्या वापरासाठीची परवानगी मिळाली आहे.
मॉडर्ना कोविड -19 या लसीने आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी वैधानिक निकष पूर्ण केले आहेत, असे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने प्रसिद्ध् केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मॉडर्नाची लस उपलब्ध झाल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशवासियांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.
मॉडर्नाने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे जे रिपोर्ट सादर केले होते, त्याच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या लसीला परवानगी दिली गेली आहे, असे “एफडीए’ने म्हटले आहे. 196 उमेदवारांवर झालेल्या प्राथमिक चाचण्यांच्या विश्लेषणामध्ये लसीच्या प्रभावीपणाचे प्रमाण 94.1 टक्के दर्शविले गेले आहे. ही लस 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे.
फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या माध्यमातून अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनीही शुक्रवारी लस घेतली.